Wednesday, April 1, 2009

शैलीदार पत्रकार

प्रत्येक क्षेत्रात काही प्रसन्न व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांच्या सहवासात इतरांना काम करण्याचा उत्साह येतो. दुसऱ्याची उणीदुणी काढण्यापेक्षा किंवा आपल्या ज्येष्ठतेचा टेंभा मिरवण्यापेक्षा नवशिक्या सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत राहणे त्यांना आवडते. अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक होता व्यंकटेश चपळगावकर. पत्रकारांमध्ये तो हवाहवासा वाटणारा होताच, राजकीय-सामाजिक क्षेत्रांमध्ये, खासगी दूरचित्रवाणी वाहिन्या पाहणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षकांमध्ये, व्यंकटेशच्या बातम्या सादर करण्याच्या शैलीबद्दल कौतुकाची भावना होती. ‘स्टार माझा’ या वाहिनीचा तो ब्युरो चीफ होता. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडय़ातील वृत्तांकनाची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती. या विभागातील बातमीदारांकडून बातम्या करवून घेण्याची जबाबदारी असतानाही बातमीदारीचा कस पणाला लागण्याच्या प्रसंगी तो स्वत: झोकून देऊन मैदानात उतरे. बीडमध्ये १६ मार्च १९७१ला जन्मलेल्या व्यंकटेशचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षणही तेथेच झाले. बातमीदारीची आवड असल्याने शिक्षण झाल्यावर त्याने ‘महाराष्ट्र टाइम्स’साठी बीडहून बातम्या पाठविणे चालू केले. त्यानंतर ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीमध्ये उपसंपादकपदी तो रुजू झाला. आपल्या लिखाणाच्या शैलीने त्याने लिखित माध्यमावर आपला ठसा उमटवला. पण नित्य नवे करण्याचा स्वभाव त्याला गप्प बसू देईना. २००० मध्ये ‘मिटकॉन’ या संस्थेत अधिकाराचे पद चालून आल्यावर त्याने ती जबाबदारी स्वीकारली, मात्र केवळ लिखापढीमध्ये मन लागेना. वर्षभरातच त्याने सार्सच्या लागणीबाबतचे एक वृत्त तेव्हाच्या ‘स्टार न्यूज’ वाहिनीला दिले. त्या वाहिनीने त्याला प्रतिनिधीपदाची संधी देऊ केली. त्याने ती स्वीकारली. अखंड मेहनतीमुळे त्याला बढतीच्या संधी मिळण्यास फारसा वेळ लागला नाही. त्याला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ासारख्या मोठय़ा भागाचे प्रमुखपद मिळाले. ही जबाबदारी त्याने सक्षमपणे सांभाळली. लिखित माध्यमांसाठी बातमीदारी करताना एक दिवस तरी हातात असतो, परंतु इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी दिवसभर थांबता येत नाही, तर प्रत्येक तास, मिनिट आणि क्षण महत्त्वाचा असतो. इतर माध्यमांशी स्पर्धा करीत इतरांच्या आधी बातमी द्यावी लागते, तीही अचूक असावी लागते, त्या बातमीत पुरेसा तपशील असावा लागतो आणि त्यासोबत दृष्यफितीही असाव्या लागतात. यासाठी शारीरिक धडपड, हजरजबाबीपणा, विविध क्षेत्रांत उत्तम संपर्क, राजकीय आणि सामाजिक विषयांची चांगली जाण असावी लागते. या सर्वच निकषांवर व्यंकटेश गुणवत्तापूर्ण ठरला होता. मंत्री धर्मराव अत्राम यांच्या शिकार प्रकरणाचे अनेकांगांनी वृत्तांकन करून तो विषय त्याने राज्य पातळीवर नेला. वरिष्ठांनी नेमलेल्या कामाव्यतिरिक्त अनेक प्रसंगांत उडी टाकून बातमी शोधून काढण्याचेधैर्य त्याच्यात होते. मुंबईवर २६ नोव्हेंबरला अतिरेक्यांनी हल्ला केला, त्यावेळी तो इंदूरला होता,हल्ल्याची बातमी समजताच तडक मुंबई गाठून जीव धोक्यात घालून त्याने वृत्तांकन केले. श्रीलंकेत तेथील सैन्याची तामिळ अतिरेक्यांबरोबर मोठी चकमक झाली, त्याचे वृत्तांकन करण्याच्या इच्छेने तो श्रीलंकेला पोहोचला, मात्र त्याला विमानतळावरूनच आल्या पावली परतावे लागले. तरीही त्याच्यातील उत्साह कमी झाला नाही. केवळ दैनंदिन वृत्तांकन करून न थांबता बातम्यांचे वेगवेगळे विषय शोधून प्रेक्षकांसमोर मांडणे त्याने चालूच ठेवले. ‘साध्याच विषयांत आढळे मोठा आशय’ या उक्तीप्रमाणे लहानलहान विषयही तो आवडीने करी. एका व्यक्तीने आपल्या गच्चीत उत्तम बाग केली होती. त्याची मुलाखतही व्यंकटेशने मोठय़ा आवडीने घेतली. दुसऱ्या माध्यमांमधील लिखाणाची हेटाळणी करणे त्याच्या स्वभावात नव्हते. त्यामुळेच वृत्तपत्रांमध्ये आलेल्या चांगल्या बातमीचा पाठपुरावा तो करी. भल्या पहाटेच त्याचे वृत्तपत्रवाचन पूर्ण झालेले असे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढा येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे वृत्त टिपण्यासाठी याच उत्साहातून तो सोमवारी रात्री मोटारीने सोलापूरकडे रवाना झाला होता, मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. सोलापूर रस्त्यावरील एका पुलावरून त्याची मोटार कोसळली आणि या उत्साहमूर्तीचा दुर्दैवी अंत झाला. आता त्याच्या मित्रवर्गाकडे शिल्लक राहिल्या आहेत त्या लुकलुकणाऱ्या डोळ्यांमधून ओसंडून वाहणाऱ्या निर्मळ हास्याच्या, नावीन्य शोधणाऱ्या, सततच्या धडपडीच्या, निखळ मैत्रीच्या निव्वळ आठवणी!