Saturday, February 21, 2009

लातूर दर्शनिका

लातूर दर्शनिका जिल्ह्य़ाचे यथार्थ स्वरूप ज्यात व्यक्त होते, दाखविले जाते तो ग्रंथ म्हणजे जिल्हा दर्शनिका (District Gazetteer). गॅझेटिअर म्हणजे प्राकृतिक भूस्वरूप, नद्या, वनसंपदा, स्थळांची भौगोलिक माहिती, लोकांच्या चालीरीती, राजघराण्याचा इतिहास, आर्थिक व्यवस्था, महसूल, प्रशासन आणि पुरावशेषांचा तपशील देणारा कोश. पण त्याचबरोबर नवीन उपलब्ध ज्ञानाआधारे राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक इतिहासावर नवा प्रकाश टाकणेही अपरिहार्य ठरणारे. ‘लातूर दर्शनिका’ लिहिण्याचा प्रयत्न त्यातून झाला. मराठी जिल्हा गॅझेटिअर मालिकेतील हे आठवे पुष्प उद्या प्रकाशित होते आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात बॉम्बे प्रेसिडेंसीमधील जिल्ह्य़ांसाठी ग्रंथनिर्मिती झाली. पण निजाम डोमिनिअन्समधील मराठवाडय़ासाठी केवळ ‘औरंगाबाद जिल्हा गॅझेटिअर’ १८८४ मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने निश्चित केलेल्या आकृतीबंधाप्रमाणे तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्य़ासाठी (१९७२) जिल्हा गॅझेटिअर इंग्रजी आवृत्ती करण्यात आली. त्यामध्ये तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्य़ात अंतर्भूत असलेल्या लातूर जिल्ह्य़ाची माहिती दिली होती. तथापि या आकृतिबंधाच्या स्वत:च्या अशा काही मर्यादा होत्या.महाराष्ट्रात नव्याने निर्माण झालेल्या जिल्ह्य़ांपैकी लातूर जिल्ह्य़ासाठी प्रथमच जिल्हा दर्शनिका प्रकाशित होत आहे. लातूर जिल्हा निर्मितीचाही मोठा इतिहास आहे. सन १९०५ पर्यंत औसा तालुक्यातील एक गाव आणि मोठी बाजारपेठ असलेले हे शहर विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत असताना दिनांक १६ ऑगस्ट १९८२ रोजी जिल्हा मुख्यालय झाले. १९९९ पर्यंत याचा विस्तार होत दहा तहसील केंद्रांचा अंतर्भाव असलेला हा जिल्हा झाला. मराठवाडय़ातील हा जिल्हा महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेस आहे. जिल्ह्य़ाची आग्नेय सीमा कर्नाटकातील बिदर जिल्ह्य़ाशी संलग्न आहे. जिल्ह्य़ाचा बहुतेक भाग हा बालाघाट पठारी प्रदेशाचा आहे. मांजरा आणि तिची उपनदी तावरजा, तेरणा तसेच मन्याड, तिरु, घरणी या नद्यांनी हा भाग सुजलाम केला आहे. किल्लारी भूकंपामुळे महाराष्ट्राच्या भौगोलिक जडणघडणीचा नव्याने विचार सुरू झाला. भूकंपग्रस्तांचे इतक्या मोठय़ा प्रमाणात नियोजनबद्ध रीतीने झालेले पुनर्वसन हे संपूर्ण देशात आदर्शवत मानले गेले. सर्व मानवी प्रवृत्तींचे दर्शन होऊनसुद्धा निर्मितीक्षम कार्याची क्षमता लातूर जिल्ह्य़ाने स्पष्ट केली.प्राचीन भारतातील सोळा महाजन पदांपैकी अश्मक या जनपदात लातूरचा समावेश होता अशी नोंद आढळते. त्यामुळे आणि विशेषत: तगर येथे सापडलेल्या स्वतंत्र नाण्यात ‘तगर लत्तलूर’ अशा स्वतंत्र जनपदाची नोंद आढळल्यापासून लातूरच्या सांस्कृतिक इतिहासाचा प्रारंभ मानला गेला आहे. तिथपासून या असंख्य नोंदी या ग्रंथात आहेत. राष्ट्रकूट राजवंशात लातूर हे राजकीय हालचालींचे केंद्र बनले, तिथे गढीवाडय़ांची उभारणी झाली. रष्गिरी अशीही नामनोंद या काळात सापडते. रटनौर- रटनौर- लत्तलूर- लातूर याप्रकारे नावात झालेले परिवर्तन या ग्रंथात क्रमाक्रमाने उलगडून दाखविण्यात आले आहे.महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनात आवर्जून नोंद घ्यावी असा भीमसागर जलाशय गणेशवाडी येथे ३० नोव्हेंबर १०९९ मध्ये निर्माण करण्यात आला. याविषयीचे पुरातत्वीय अवशेष व शिलालेख आहेतच. याच प्रकारच्या शिलालेखांमध्ये औसदेश, उदगीरदेश यांच्याही नोंदी सापडल्या आहेत. याच काळातील लेण्यांमध्ये बौद्ध, जैन आणि हिंदूधर्मीयांच्या अनुयायांच्या वास्तव्यखुणाही सापडल्या आहेत. याशिवाय लातूर येथील सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर, भूतेश्वर मंदिर तसेच निलंगा येथील नीलकंठेश्वर मंदिर, पानगाव येथील विठ्ठल मंदिर, औसा तालुक्यातील बोरगाव, तसेच बोरी, बल्लाळ चिंचोली, मुरुड आणि गंगापूर याशिवाय अहमदपूर तालुक्यातील झरी बुजुर्ग आणि शिरुर अनंतपाळ, रामलिंगम मुदगड, निठूर, भूतमुंगळी येथील विविध मंदिरांच्या सापडलेल्या खाणाखुणा या क्षेत्रांच्या दहाव्या ते तेराव्या शतकांपर्यंत होत गेलेल्या विकासाची साक्ष देणाऱ्या आहेत. निजामकाळात जिल्ह्य़ात ज्या गढी-वाडय़ांची निर्मिती झाली, त्यातल्या अनेकांची नोंद प्रथमच या दर्शनिकेत घेण्यात आली आहे, स्वातंत्र्याच्या लढय़ात या गढीवाडय़ांचे स्वत:चे असे वेगळेपण होते, हेही यानिमित्ताने पुढे आले आहे.१८५७ या आंदोलनाचे पडसाद हैदराबादप्रमाणे लातूर जिल्ह्य़ामधील उदगीर व निलंगा येथे उमटले. १८५७ ते १८६४ पर्यंत सशस्त्र उठावाची एक मालिकाच सुरू होती. परिणामी ब्रिटिशांनी कोर्टमार्शल करून अहमदाबाद येथे बहात्तर लोकांना फाशीदेखील दिली होती.याच काळात आर्य समाजाची चळवळ सामाजिक प्रबोधनाचे कार्य करीत होती. १९३८-३९ मध्ये आर्य समाजाने केलेल्या सत्याग्रह आंदोलनात जवळपास १२००० लोकांचा सहभाग होता. याच काळात लातूर येथे लोकमान्य टिळकांनी भेट दिली होती. ७ ऑगस्ट १९४७ ला मुक्तिसंग्रामाचे शेवटचे पर्व सुरू झाले. स्वामी रामानंदतीर्थ यांनी ‘हिंदी संघराज्य समावेश दिन’ म्हणून ७ ऑगस्ट घोषित केला. परिणामी आंदोलन तीव्र झाले. १५ ऑगस्ट १९४८ च्या स्वातंत्र्यदिनाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी फुलचंद गांधी यांच्या नेतृत्वाखाली पासष्ट गावांच्या समूहाचे ‘मुक्तिपूर स्वराज्य’ स्थापन करण्यात आले. यांसारख्या अनेक बाबींचा परिणाम म्हणून १७ सप्टेंबर १९४८ ला लष्करी कारवाई होऊन मराठवाडा स्वतंत्र झाला.संत आणि साहित्यिकांची या जिल्ह्य़ात लाभलेली परंपरा फार मोठी आहे.भौगोलिक वैशिष्टय़े, इतिहास आणि सांस्कृतिक परंपरा, लोकजीवन, कृषी व जलसिंचन यातील नवीन प्रयोग, नैसर्गिक आपत्तीसाठी स्वतंत्रपणे घेतलेला र्सवकष आढावा आणि उद्योगधंदे, सहकारी साखर उद्योगांचे यश, फळबाग उत्पादनाची होणारी परदेशी निर्यात, बँक, व्यवसाय, व्यापार व वाणिज्य, वाहतूक व दळणवळण या क्षेत्रांतील उपलब्धी आणि आर्थिक विकासाचा वेग, प्रशासन, सामाजिक सेवा क्षेत्रातील कार्य आणि संपूर्ण जिल्ह्य़ाचा सांस्कृतिक वारसा ज्यात कला, नाटय़, क्रीडा, साहित्य परंपरेचा र्सवकष वेध घेण्याचा प्रयत्न या ग्रंथात आहे. जिल्ह्य़ातील पर्यटन स्थळे, ज्यात ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाची स्थाने यांचाही परिचय आला आहे.मूलत: गॅझेटिअरसारख्या ज्ञानशाखेची सातत्याने होणारी वाटचाल आणि पुनरावृत्ती ही निरंतर सुरू असणाऱ्या संशोधन प्रक्रियेचा एक भाग ठरतो. विभाग प्रमुखांसह सर्व सहकाऱ्यांनी केलेले प्रत्यक्ष सर्वेक्षण विविध पातळीवरील शासकीय व निमशासकीय संस्था तसेच व्यक्तींकडून प्राप्त झालेली माहिती याचे संकलन व संपादन करताना संपादक मंडळाचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन यातून साकारलेला हा ग्रंथ आहे. जिल्हा निर्मितीची पंचवीस वर्षे होताना पूर्ण झालेले लातूर गॅझेटिअर ऐतिहासिक संदर्भ साहित्यात मोलाची भर घालेल असा विश्वास आहे.लातूर जिल्हा दर्शनिका (गॅझेटिअर) प्रकाशित करताना त्यात या ग्रंथाचे वैशिष्टय़ म्हणून ज्याची नोंद करता येईल अशी ग्रामनिर्देशिका दिली आहे. परिणामी ग्रंथाची पृष्ठसंख्या विचारात घेता ग्रंथ हाताळण्याच्या दृष्टीने सोयीचा व्हावा या दृष्टीने ही दर्शनिका नागपूर जिल्हा दर्शनिकेप्रमाणे दोन भागांत प्रकाशित करण्यात आली आहे. या विभागाच्या वतीने सर्व पूर्व प्रकाशित राज्य व जिल्हा दर्शनिका तसेच ब्रिटिशकालीन जिल्हा गॅझेटिअर्स यांचे ई-बुक आवृत्तीमध्ये रूपांतर करण्याचे काम पूर्ण झाले असून महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर (www.maharashtra.gov.in) ते उपलब्धही करून देण्यात आले आहे. राज्य दर्शनिका मालिकेत महाराष्ट्रातील ‘वनस्पतिशास्त्र आणि वनसंपदा’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले असून ‘औषधी वनस्पती’ या राज्य गॅझेटिअरची दुसरी आवृत्ती आम्ही नुकतीच प्रकाशित केली आहे, तर ‘लँड अ‍ॅण्ड इट्स पीपल’ या गॅझेटिअरचे मुद्रण सुरू आहे. जिल्हा गॅझेटिअर मालिकेतही नांदेडचे काम सुरू आहे.

No comments: