Thursday, December 17, 2009

समृद्ध संगीत वारसा

मराठवाडा ही जशी संतांची भूमी तशीच संतकाव्याला घरा-घरात पोहोचविणाऱ्या संगीताची भूमी. संत नामदेव, एकनाथ, ज्ञानेश्वर, दासोपंत, जनाबाई जसे या भागातले तसेच गोपालनायक, शांरगदेवदेखील याच मातीतले. अध्यात्म आणि संगीत जणू या घराचे अंगण आणि परसदार. अनेक राजवटींच्या आक्रमणांनी सोशिक झालेली जनता संगीताच्या बाबतीतसुद्धा सहिष्णुता बाळगून होती. ओव्या, गवळणी, गोंधळ, अभंग या लोकसंगीताबरोबरच कव्वाली, गजल, नातिया यातही इथली लोकं रमली. मराठी, उर्दू, तेलगू, कानडी, हिंदी या भाषा इथे एकत्र नांदत होत्या. उत्तर आणि दक्षिण भारत याला जोडणारे हे दख्खन पठार हिंदू व मुसलमान संस्कृतीच्या समन्वयाचे आदर्श उदाहरण होते.


१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्याआधी साधारण २०० वर्षांपासून मराठवाडय़ात निजामशाही होती. इंग्रज राजवटीत सर्वात बलाढय़ संस्थान म्हणून या संस्थानाचा उल्लेख व्हायचा. हैदराबाद या संस्थानाची राजधानी असल्यामुळे संपूर्ण मराठवाडय़ाच्या दळणवळणाचाही केंद्रबिंदू होती. उच्च शिक्षणासाठी मराठवाडाभर जी तरुण मुले हैदराबादला जायची ती व्यावसायिक शिक्षणाबरोबर संगीत कलेची आवड जोपासायची. मराठवाडय़ात परतल्यावर संस्थांमार्फत त्या कलेचा पाठपुरावा करायची. अशा प्रकारे मराठवाडय़ातल्या संगीताची नाळ हैदराबादशी जोडली गेली. निजाम स्वत: कलासक्त आणि रसिक राजा होता. शास्त्रीय संगीतातले दिग्गज उस्ताद विलायत खाँ, उस्ताद बिसमिल्ला खाँ, पंडित रवीशंकर, बडे गुलाम अली खाँ, पं. गजाननबुवा जोशी, रोशनआरा बेगम अशी अनेक नामवंत कलाकार राजदरबारी कला सादर करीत. दरबारातील मैफलींचा आस्वाद निजामाबरोबर तेथील मराठी नोकरशाही घ्यायची. अशा पद्धतीने संगीत कलेबद्दलचे प्रेम मराठी समाजात झिरपत गेले. त्या काळी हैदराबाद आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी निजामाची रेडिओ स्टेशन होते. त्यामुळे दोन्ही ठिकाणी संगीत कलाकारांची भरपूर वर्दळ असे. त्यातून सांगितिक वातावरणाची निर्मिती या शहरांत होत असे. तानरस घराण्याचे शब्बूखाँ, मियाँ घराण्याचे जैनूल अब्दीन खाँ आणि मुझफ्फर खाँ यांची गायकी यामुळे मराठवाडय़ातील रसिकांना भरपूर ऐकायला मिळाली. भटजीबापू यांचा टप्पा, अप्पातुलसी यांची संगीतविषयक पुस्तके, दत्तात्रय पर्वतीकर यांचे दत्तवीणेचे संशोधन- अशा अनेक वैशिष्टय़पूर्ण सांगितिक घटनांच्या नोंदी संगीतजगतात हैदराबादच्या नावे नोंदविल्या गेल्या. याशिवाय अनेक उत्तम वादकही या संस्थानाने रसिकांना दिले. वासुदेवराव लासीनकर, मार्तंडबुवा काळे, बाबुराव केलवाड, शेख दाऊद हे त्यातील काही आघाडीचे कलाकार. शंकरशंभू यांच्या कव्वाल्या, बालगंधर्वाची नाटके, पाचलेगावकर महाराज, बंडा महाराज देगलूरकर यांची कीर्तने लोकांना मंत्रमुग्ध करायची. माणिकनगरचे माणिकप्रभू महाराज हे तर कलाकारांचे आश्रयदाते होते. त्यांच्याकडे चालणाऱ्या महोत्सवाला हजेरी लावण्यासाठी संपूर्ण भारतातून अनेक कलाकार येत.

संगीताबद्दल समाजात आवड निर्माण झाल्याचे चिन्ह म्हणून की काय पं. रातंजनकरांचे शिष्य गोविंदराव दंताळे यांच्या शासकीय संगीत शाळेतून अनेक मुले-मुली उत्तम गायक म्हणून तयार होत. मध्यमवर्गीय नोकरदार मंडळी नाटय़संगीत, भावगीते, कीर्तने, शास्त्रीय संगीत या संगीतप्रकारांद्वारे या कलेच्या जवळ गेली. संगीताच्या वर्गात बसून सारेगमचे धडे गिरवू लागली. गणेशोत्सवात होणारे मेळे, मंगळागौरी, सप्ताह, भजनी मंडळे, मासिक सभा ही या शिकाऊ विद्यार्थ्यांची व्यासपीठे बनली. गुरुशिष्य परंपरा आणि विद्यालयीन संगीत अशा दोन्ही संगीत पद्धती संस्थानात बहरल्या. त्याचेच प्रतिबिंब मराठवाडय़ात औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड या मोठय़ा गावांमध्ये उमटले.

हैदराबाद संस्थानापासून अलग होऊन मराठवाडा मुंबई स्टेटमध्ये सामील झाला. वर्षांनुवर्षे हैदराबादशी असलेले राजकीय नाते संपुष्टात आले. मराठवाडय़ाचा सर्वागीण विकास होण्याच्या दृष्टीने या विभागाची औरंगाबाद, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, बीड या पाच जिल्ह्य़ांत विभागणी झाली. हैदराबादमध्ये शिक्षण आणि नोकरीसाठी एकवटलेला मराठी मध्यमवर्ग नवीन आव्हाने पेलण्यासाठी मराठवाडय़ात विखुरला गेला. हैदराबादमध्ये असताना संगीत श्रवण व गायनाचा छंद नव्या ठिकाणी नव्याने जोपासायला तयार झाला. या आशादायी घटनेआधीच एक दु:खद घटना संगीत प्रसाराच्या क्षेत्रात घडली. १९५३ साली औरंगाबादचे रेडिओ स्टेशन पुण्याला हलविले गेले. त्यानिमित्ताने येणारे कलाकार, होणाऱ्या खासगी मैफली यांना एकदम ओहोटी लागली. एका बाजूने हैदराबादशी संपर्क तुटलेला आणि दुसऱ्या बाजूला रेडिओ स्टेशन गेल्याने कलाकारांची रोडावलेली संख्या अशी मराठवाडय़ाची कोंडी झाली. त्याला वाट मिळाली ती संगीत शिक्षणाच्या संघटनात्मक रूपातून. संगीत शिक्षणासाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे अनेक वर्ग मराठवाडय़ात चालू झाले. संगीताच्या ज्ञानाची पायाभरणी नव्याने सुरू झाली. क्रमिक पद्धतीने गायन शिकण्याला लोकांकडून अधिक प्रतिसाद मिळू लागला. या बदलाचे जनक होते पं. स. भ. देशपांडे ऊर्फ पं. सखाराम भगवंत देशपांडे.

१९५२ साली पं. स. भ. देशपांडे हैदराबादला विवेकवर्धिनी शाळेत संगीत शिक्षक म्हणून रुजू झाले. संगीतप्रवीण झालेले पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडून शास्त्रीय संगीताची पक्की तालीम घेतलेले आणि पुण्यात गायन शिकविण्याचा अनुभव असलेले ‘स.भ.’ संगीताच्या कक्षा विस्तारण्याची स्वप्ने घेऊन हैदराबादला आले. सांस्कृतिक अनुकूलता मिळाल्यामुळे त्यांचे संगीताचे वर्ग वेगाने वाढले. स्वभावातील साधेपणा, कलेविषयी निष्ठा, कल्पकबुद्धी, दूरदृष्टी आणि ज्ञानाचे अपार भांडार यामुळे लवकरच पं. स. भ. देशपांडे हे मराठवाडय़ाच्या संगीत प्रसाराचे आधारस्तंभ बनले. गायक, प्रचारक, रचनाकार, लेखक, संयोजक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पेलल्या. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव संपूर्ण मराठवाडय़ातच नव्हे तर महाराष्ट्रभर पडला. त्यांच्या अमूल्य कार्याची दखल घेऊन अ. भा. गांधर्व मंडळाने त्यांना महामहोपाध्याय अशा पदवीने सन्मानित केले. स. भ. देशपांडे यांनी केलेल्या कष्टाची फळे लवकरच मराठवाडय़ाला चाखायला मिळाली. त्यांनी तयार केलेले शिष्य मराठवाडय़ातील अनेक गावांमध्ये जाऊन संगीताचा प्रसार करू लागली.

औरंगाबाद येथे स्वातंत्र्यपूर्वकाळातदेखील संगीताचे चांगले वातावरण होते. गणेशोत्सव, उरूस यातून अनेक चांगले कलाकार रसिकांना ऐकायला मिळाले. केशवराव धोंगडे, गोविंदराव पिंपळे, रामचंद्रबुवा टोपरे, शंकरराव बहिरगावकर यांच्यासारखे गायक औरंगाबाद परिसरात तयार झाले. सरदार सरोद्दीन आणि सरदार ओंकारांसारखे दिलदार आश्रयदाते तेथे होतेच. जालना येथे राहमाऱ्या उस्ताद शब्बूखाँ यांनी तानरस घराण्याचे उत्तम गाणेच नाही तर अप्पा जळगावकरांसारखे उत्तम शिष्य घडवून रागसंगीताच्या प्रसारात मोलाची भर घातली. आकाशवाणी औरंगाबादमुळे (ज्याला शहरात नशगाह- सरकार-ए-अली म्हणत) संजीवनराव, भोलानाथ जंजाळे, रमजान खाँ, पांडुरंग शिवलकर, एस. एन. जाईबहार आणि नवनीतभाई पटेलांसारखे कलाकार स्टाफ आर्टिस्ट म्हणून लाभले. त्यामुळे औरंगाबाद विभागात संगीताचे दर्जेदार वातावरण तयार झाले. गौतमराव आहेरकरांसारखे कलाकार यामुळेच निर्माण झाले. औरंगाबाद जिल्ह्य़ात दुसऱ्या कोपऱ्यात असलेल्या अंबड येथे गोविंदराव जळगावकरांसारखे संगीतप्रेमी जमीनदार संगीतप्रसारासाठी अविरत परिश्रम करीत होते. ते स्वत: उत्तम नाटय़गीते गात. त्यांनी अंबड संगीत महोत्सवासारखा उत्सव सुरू करून संस्थात्मक रूपात गावांत संगीत प्रसाराचा पायंडा पाडला. औरंगाबादजवळील पैठण येथेही नाथपरंपरेतून आलेले शास्त्रीय संगीत नाटके आणि बालगंधर्वाचा पडलेला प्रभाव यातून गोविंदराव भावठाणकर, दिंगबरराव सेवेकरी, राजेश्वरराव शेडगेंसारखे गायकनट तयार झाले. मामा, मामी दातार, कुसुमताई जोशी, साधना वैद्य, विश्वनाथ पोहेकर आणि द्वारकादास पटेल यासारखे प्रयोगशील कलाकार आणि मुरलीधरराव गोलटगावकर, नरेंद्र चपळगावकर, चंद्रकांत भालेराव, लक्ष्मण देशपांडेंसारख्या बालकलाकारांमुळे औरंगाबादचे संगीत क्षेत्र बहरले.

मागील पाच दशकांत औरंगाबाद विभागात संगीत विद्यालये आणि संगीत संस्था यांना प्रोत्साहन मिळाले आणि संगीत शिक्षणाची ही पद्धत अधिक लोकप्रिय झाली. पं. उत्तमराव अग्निहोत्री, नाथराव नेरळकर, मधुसूदन भावे, पं. यशवंत क्षीरसागर यांच्यासारखे गायक-गुरू संगीत शिक्षणाचे कार्य करू लागले. आशालता करलगीकरांसारख्या गायिका औरंगाबादेत स्थिरावल्या. नव्या आकाशवाणीच्या निमित्ताने आलेले श्री. विश्वनाथ व माधुरी ओक, पं. रमेश सामंत, पं. सतीशचंद्र चौधरी हे कलाकार औरंगाबादला स्थायिक होऊन संगीत प्रसार करू लागली. संगीत महाविद्यालयांमधून डॉ. चित्रलेखा देशमुख, डॉ. विजयालक्ष्मी बर्जे, डॉ. करुणा देशपांडे, सीताराम गोसावी, चित्रा निलंगेकर, विजय देशमुख यांनी अनेक विद्यार्थ्यांना संगीताचे प्रशिक्षण दिले आहे.

मराठवाडय़ातील दुसरे मोठे शहर नांदेड. येथेही मागील ५०-६० वर्षांपूर्वी संगीताने झपाटलेल्या एका गानगुरुचा करिष्मा संपूर्ण मराठवाडाभर पसरला होता. डॉ. अण्णासाहेब गुंजकर हे त्यांचे नाव. संगीतप्रसाराचे ध्येय घेतलेल्या अण्णासाहेबांनी डॉ. स. भ. देशपांडे यांच्या सल्ल्याने १९५३ साली संगीत विद्यालयाची स्थापना केली. त्यांनी शिष्यांना क्रमिक पद्धतीने शिक्षण तर दिलेच, शिवाय अनेक वाद्यवृंदरचना, सांगितिका, भजने यांची रचना केली. उत्तम संघटनकौशल्य, ग. ना. अंबेकर, आनंदीदास लव्हेकर, तुकारामपंत चौधरी, मनोहरराव कांडलीकर यांच्यासारखे मित्र आणि प्रचंड चिकाटी या जोरावर त्यांनी नांदेड शहर संगीतमय केले. संगीत संमेलने, चर्चासत्रे, पं. पलुस्कर-भातखंडे यांची पुण्यतिथी असे अनेक प्रकारचे सांगितिक उपक्रम हाती घेऊन मराठवाडय़ात चैतन्य निर्माण केले. त्यांचे शिष्य नाथराव नेरळकर, पं. उत्तमराव अग्निहोत्री, शाम गुंजकर, रमेश कानोले, सौ. सीता राममोहनराव यांनी पुढची आघाडी सांभाळली. शास्त्रीय संगीताबरोबरच कीर्तन-संगीतातील दोन दिग्गज नांदेड जिल्ह्य़ात होऊन गेले. ह.भ.प. बंडा महाराज देगलूरकर आणि तालमार्तंड रंगनाथबुवा देगलूरकर यांनी कीर्तनपरंपरेला शास्त्रीय गायन व वादनाची जोड देऊन एक नवा पैलू विकसित केला. लयीशी क्रीडा करीत चक्रदार पद्धतीने दोघांचे एकत्र समेवर येणे लोकांची वाहवा मिळवून जायचे. दासगणू महाराजांची कीर्तन परंपरा पुढे दामूअण्णा आठवले आणि नंतर तुकाराम आजेगावकर, अप्पा महाराज आठवले यांच्याकडे आली. वारकरी कीर्तन परंपरेतून दे. ल. महाजन आणि आनंदीदास लव्हेकर यांनी नांदेड जिल्ह्य़ात रंग भरला.



बीड जिल्ह्य़ात संगीताचा प्रसार प्रामुख्याने कीर्तनातून झाला. बीड, अंबाजोगाई या मोठय़ा गावांमध्ये संगीताचे वातावरण अधिक होते. बीडजवळील नेकनूर येथील बंकटस्वामी, भगवान महाराज, भीमसिंग महाराज यांनी कीर्तनातून सहविचारांबरोबर संगीताचा प्रसार केला. बंकटस्वामी उत्तम पखवाजवादक होते. त्यांची ही वादनाची परंपरा पुढे शंकरबापू आपेगावकर, बाबुराव डवरी आणि माधवराव सुकाळे यांनी चालविली. वारकरी संप्रदायात धृपद गायकीसारखे त्रिपल्लीचक्रदार, आडकुआड करून कीर्तन रंगविण्यात हातखंडा असलेले सीताराम पाटील आणि भीमराव पाटील पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. विसाव्या शतकात शास्त्रीय संगीताचा पाया बीड जिल्ह्य़ात नाटय़संगीतातून भरला गेला. देविदासराव मांडे, सदाशिवराव बाबरस, सखारामपंत निर्मळ, राजाभाऊ हंप्रस यांनी अनेक संगीत नाटकांमध्ये काम करून संगीताची गोडी रसिकांना लावली. नंतर बार्शीचे मोठे गायक धोंडोपंत दिवाकर यांनी विष्णु धुतेकर, वसंत मांडे, किशोरसिंह बुंदेले यांना रागगायनाचे धडे दिले. त्यांनी याद्वारे भावी पिढीसाठी संगीताचा वारसा तयार केला. अंबाजोगाई येथे नारायण सेलूकर उत्तम नाटय़संगीत गात. राम कदम यांनी अनेक कलाकारांना आपल्या घरी ठेवून घेऊन संगीत प्रसारात मोलाची कामगिरी बजावली. सोनपेठचे शंकरबुवा जोशी, दासबुवा चोथवे यांची नाटय़गीते त्याकाळात प्रसिद्ध होती. स्वातंत्र्यानंतर संगीत प्रसाराला दिशा महाविद्यालयीन अभ्यासातून मिळाली. पं. शिवदास देगलूरकरांनी यात सिंहाचा वाटा उचलला. खोलेश्वर महाविद्यालयात संगीत अध्यापन करता करता त्यांनी गुरुकुल पद्धतीनेदेखील अनेक शिष्य तयार केले. जुन्या-नव्या कलाकारांची सूची असलेला मराठवाडा संगीत गौरव ग्रंथ प्रकाशित केला. तसेच अनेक सांगितिक प्रयोग करून सर्वस्पर्शी संगीत प्रसार केला.

परभणी जिल्हा रंगला तो नाटय़संगीतात! विसाव्या शतकाच्या प्रारंभी परभणीचे शंकरराव नानल आणि नंतर रंगराव जिंतूरकर यांनी नाटय़संगीताचे वेड परभणीकरांना लावले. श्रीधरराव मुळावेकर, दिनकर कंधारकर, रंगराव देशपांडे आदी गायक जमवून मैफली रंगत. स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने परभणी जिल्ह्य़ात संगीताचा प्रसार केला तो पं. गुलाम रसूल आणि पं. स. भ. देशपांडे यांचे शिष्य डॉ. कमलाकर परळीकर यांनी. गुलाम रसूल साहेबांनी अलाहाबादच्या प्रयाग संगीत समितीची शाखा परभणीत काढली. डॉ. कमलाकर परळीकर यांचा शिष्य परिवार इतका मोठा आहे की संगीत आवडणारा प्रत्येक तिसरा रसिक त्यांच्याकडे संगीत शिकून आलेला असतो. गायन शिकून जसा विद्येचा प्रसार होतो तसेच उत्तम गायन ऐकूनही संगीताची जाण वृद्धिंगतहोते. ही कसर अ‍ॅड्. वसंत पाटील यांनी भरून काढली. देशभरातील अनेक नामवंत कलाकारांनी स्वत:ची पदरमोड करून कला सादर केली. बासरीवादक दत्ता चौगुले यांनी वसमत येथे दर कृष्णाष्टमीला कार्यक्रम आयोजित करून तेथे संगीत आणले. कीर्तन परंपरेतील विष्णू महाराज पारनेरकर यांच्याकडील राघवेंद्र स्वामी मठ, पाचलेगावकर मंदिर, नारायण महााज संस्थान येथील कीर्तन महोत्सवांनी संगीत प्रसार घडवून आणला.

उस्मानाबाद जिल्ह्य़ात संगीत प्रसाराचा महत्त्वाचा वाटा नारायण जुक्कलकर आणि उत्तमराव पाटील यांनी उचलला. लातूरचे संगीतप्रेमी भीमशंकरअप्पा पंचाक्षरी यांनी गंजगोलाई नवरात्र महोत्सवात शास्त्रीय गायनाच्या सभा घेऊन संगीत प्रसाराचा नवा पायंडा पाडला. विशुद्ध संगीत शिक्षण देणारे शिक्षक पं. शांताराम चिगरी गुरुजी यांचे नाव संपूर्ण जिल्ह्य़ात प्रसिद्ध झाले. तालवादनाची गोडी खेडय़ापाडय़ापर्यंत पोहोचविण्याचे कार्य बोळंगे गुरुजींनी केले. संगीतनाटकातून काम करणाऱ्या बाबा बोरगावकरांनी सरस्वती संगीत विद्यालयामार्फत संगीत शिक्षण देण्याचे कार्य केले. त्यांच्या कामाचा विस्तार पुढे पुतणे श्री. बाबुराव आणि नातू राम बोरगावकर यांनी केला.

गेल्या २५-३० वर्षांत मराठवाडय़ातील सर्वच जिल्ह्य़ांत (आता आठ) संगीत अनेक महाविद्यालयांमध्ये एक विषय म्हणून सुरू झाले आहे. अनेक विद्यालये गांधर्व मंडळाच्या परीक्षांची केंद्रे झाली आहेत. मुकेश जाधव, दिलीप काळे, उद्धव आपेगावकर, राजा काळे, शशांक मक्तेदार, महेंद्र टोके, मंगेश बोरगावकर यांच्यासारखे प्रतिभावंत कलाकार मराठवाडय़ाबाहेर आपल्या समृद्ध परंपरेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. औरंगाबाद येथे पार्वतीदत्ता यांच्या ‘महागामी’ या संस्थेत कथ्थक आणि ओडिसी नृत्याचे धडे तर मीरा पाऊसकरांच्या साई नृत्यविद्यालयात भरतनाटय़मचे शिक्षण दिले जाते. विश्वनाथ दाशरथे, सचिन नेवपूरकर, ज्योती गोरे, वैजयंती जोशी, सीमंतिनी बोर्डे, मनीषा फणसळकर यासारखे तरुण शिक्षक विद्यादानाचे कार्य करीत आहेत. या शहरात नाद फाऊंडेशन आणि श्रुतिमंच या दोन संस्था नावारूपाला आल्या आहेत. सर्व ललित कलांचे मंचीय प्रस्तुतीकरण करणारी श्रुतिमंच ही संस्था सातत्याने वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन गेली सात वर्षे करीत आली आहे. या संस्थेचे प्रमुख मंगेश कुलकर्णी उत्तम तबलावादक म्हणून सुपरिचित आहेत. विविध कार्यक्रमांबरोबरच संगीत कार्यशाळा, प्रशिक्षण असे अनेक उपक्रम या मंचातर्फे घेतले जातात. अशा प्रयोगांची मराठवाडय़ात आज मोठी गरज आहे. या परिश्रमाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने यावर्षी (२००९) एक लाखाचे अनुदान जाहीर केले आहे.

नांदेड येथे सीता राममोहनराव आणि धनंजय जोशी संगीताचा प्रसार करीत आहेत. परभणी येथील संगीत स्पर्धेतून महाराष्ट्रासमोर आलेले यज्ञेश्वर लिंबेकर सुगम गायनाद्वारे योगदान देत आहेत. देविदासराव अर्धापूरकर, विश्राम परळीकर यांची विद्यालये गांधर्व मंडळाच्या परीक्षांमार्फत कार्यरत आहेत. दरवर्षी माधवराव सराफ स्मृतीप्रित्यर्थ होणारा कोजागिरी उत्सव आणि डॉ. संजय टाकळकर यांच्या घरी होणारी सूरधनत्रयोदशी परभणीच्या रसिकांसाठी पर्वणी ठरते आहे. बीड येथे सतीश सुलाखे संगीत वर्गाच्या माध्यमातून प्रसार करीत आहेत. अंबाजोगाईच्या पं. शिवदास देगलूरकर यांच्या बालगंधर्व गुरुकुलातून जयंत केजकर, कु. आसावरी देगलूरकर यासारखे उदयोन्मुख कलाकार तयार होत आहेत. उस्मानाबाद येथे दीपक लिंगे यांच्या विद्यालयातून संगीत शिक्षण दिले जाते. लातूरला बाबुराव बोरगावकर आणि राम बोरगावकर यांच्या श्री सरस्वती संगीत कला महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय आणि गरीब मुलांना मोफत शिक्षण हे या संस्थेचे वैशिष्टय़ म्हणता येईल.

दळणवळणाची आधुनिक साधने आणि वेगवान आयुष्यामुळे मराठवाडय़ातीलही सांस्कृतिक वातावरण बदलत आहे. महानगरांशी व्यावसायिक संपर्क वाढत असल्यामुळे शैक्षणिक दर्जातही सकारात्मक बदल होत आहेत. अर्थात मराठवाडय़ात गेल्या काही दशकांत आलेली समृद्धी आणि सांस्कृतिक समृद्धी यातील तफावत कमी होण्याची गरज आहे. विशेषत: मराठवाडय़ाने कलांचा जो समृद्ध वारसा अनुभवला आहे त्या पाश्र्वभूमीवर या क्षेत्रात त्याने मोठी झेप घेण्याची गरज आहे. त्यासाठी पूर्वीसारखे कलेचे आश्रयदाते आणि संस्थात्मक काम यात वृद्धी होण्याची गरज आहे. इतर क्षेत्रांत मराठवाडय़ाला मागासलेपण चिकटवले जाते; मात्र कला क्षेत्रात या शब्दाला नाकारणारे रसिक आणि कलाकारवर्ग उभा राहण्याची गरज आहे. इमारत बांधण्यासाठी पाया भक्कम असावा लागतो तो पाया मराठवाडय़ाला समृद्ध वारशाने दिलेलाच आहे. आता इमारत बांधण्यासाठी हजारो हात पुढे आले पाहिजेत.

(डॉ. अंजली मालकर यांच्या ‘मराठवाडय़ातील अभिजात संगीत’ या पुस्तकातून साभार.)
डॉ. अंजली मालकर
शनिवार, १२ डिसेंबर २००९

1 comment:

A Spectator said...

Mi marathawadyatil nahi. mi shaharat vadhalelo ahe evadhach. Pan tumacha blog vachatana bara vatala.
marathavadyatil andolananchi mahiti vachana udbodhak hota. Mi shetichya arthashastracha abhyas karato ahe. KAdhitari aplyashi bolayala avadel.